पुणे: आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच पूर्ववैमनस्याने तरुणावर कोयता, पालघन सारख्या हत्याराने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी बंडु आंदेकर व त्याच्या टोळीतील ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बंडु ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६०), ऋषभ देवदत्त आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. बंडु आंदेकर याच्या इशार्यावरुन हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. खडक पोलिसांनी काल रात्री आंदेकर याला नाना पेठेतील राहत्या घरातून अटक केली.
याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बाबु आळी) याने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ परिसरात आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. आंदेकर कुटुंबातील दोघे जण सध्या नगरसेवकही आहेत.
ओंकार कुडले आणि आंदेकर टोळी यांच्या यापूर्वी अनेकदा वादावादी झाली आहे. ओंकार कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडु आंदेकर याला वाटू लागले होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरुन व पूर्ववैमनस्यातून ऋषभ आंदेकर, गाडी गण्या, सुरज व इतर अशा ५ जणांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर कोयता, पालघन अशा धारधार हत्याराने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कुडले याच्या फिर्यादीनंतर मंगळवारी रात्री उशिरा बंडुअण्णा आंदेकर व ऋषभ आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
आंदेकर - माळवदकर या दोन टोळ्यांमधील टोळी युद्धात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे खुन पडले. माळवदकर टोळी नेस्तनाबूत झाली. मात्र, आंदेकर टोळीने आपले वर्चस्व गेल्या साडेतीन दशकापासून पूर्व भागात कायम ठेवले आहे. या टोळीयुद्धात बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. १९८५ पासून बंडु आंदेकरवर याच्या खून, खुनाचा प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे अपहरण अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हा फरासखाना, खडक व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.