मंगेश कराळे
नालासोपारा - खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा रद्द करून २५ वर्षे तुरुंगवास भोगणारा आरोपी व नंतर दोन वर्षापासून परागंदा झाल्यावर त्याला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पुण्याच्या भोसरी येथून गुरुवारी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बालन राघवन कणकरा यांचे नातेवाईक प्रभु कृष्णन नोचल यांनी आरोपी दिलीप प्रेमनारायण तिवारी यांच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. हाच राग मनात धरुन आरोपी दिलीप व त्याचे साथीदारांनी प्रभु नोचल व त्याचे तीन नातेवाईकांना ते राहत असलेल्या वसईच्या खैरपाडा येथे घरात घुसुन जिवे ठार मारले होते. त्यावेळी माणिकपुर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न असे विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.
६ ऑगस्ट २०२० रोजी कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे आरोपीत दिलीप प्रेमनारायण तिवारी यास कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पॅरोल रजेवर तुरुंग अधिक्षक यांनी रजेवर मुक्त केले होते. त्याला २७ मे २०२२ च्यापुर्वी हजर होणे आवश्यक होते. पण आरोपी याने हजर न होता तो फरार झालेला होता. त्यामुळे १८ जून २०२२ रोजी आरोपी विरुद पोलीस हवालदार जितेंद्र प्रभाकर बांदल यांनी आरोपी विरुध्द वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आरोपीचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी उत्तरप्रदेश पोलीस व आरोपीचे नातेवाईक यांचेकडुन माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. गुन्हयाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक अतुल नावले व स्टाफ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली कि, फरार आरोपी हा पुणे जिल्हयातील भेासरी येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून आरोपीला १ जूनला ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल नावले, पोलीस हवालदार मुकेश पवार, किरण म्हात्रे, मनोज मोरे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, विशाल निंबाळकर, बाळु कुटे, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.