औरंगाबाद : मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या श्रीमंतांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्यासोबतच्या शरीरसंबंधाची चोरून व्हिडिओ क्लीप तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रात्री एमजीएम परिसरात अटक केली.
विश्वनाथ अशोक माळी (२२, रा. सिडको एन-६) आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीसह तरुणीचा पोलीस शोध घेत आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुण हा गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी एका मॉलमध्ये त्याची ओळख एका तरुणीसोबत झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यांच्यातील शारीरिक संबंधाची आरोपी तरुणीने अन्य साथीदारांच्या मदतीने चोरून क्लीप तयार केली होती. ही क्लीप समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) व्हायरल करण्याची धमकी देत तिने आणि तिचा साथीदार राजू शिवशंकर सहाणी (२२, रा. गजानन कॉलनी) यांनी त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपासून ही ब्लॅकमेलिंग सुरू होती.
ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास वैवाहिक जीवनावर परिणाम होईल आणि समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रारदार यांनी आरोपी तरुणी आणि राजू सहानी यांना पाच लाख रुपये दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर यापुढे आपला कोणताही तक्रारदार यांच्याशी काहीही संबंध राहणार नाही, असे बॉण्डपेपरवर त्यांनी लिहून दिले होते. मात्र, पैशाचा उल्लेख यात केला नव्हता. दरम्यान तक्रारदार यांचे वडील एका राजकीय पक्षाकडून पैठण विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याचे त्यांना समजताच १९ आॅक्टोबर रोजी तक्रारदार तरुणी आणि तिच्या साथीदारांनी त्यांना फोन करून तीन लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी तक्रारदार यांना पैसे घेऊन एमजीएम कॅम्पस परिसरातील अंधारात सुरक्षारक्षकाच्या खोलीत पैसे ठेवण्याचे सांगितले.
तक्रारदार यांची आरोपींना खंडणी देण्याची तयारी नसल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, चालक अत्तार आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तेथे पैशाची बॅग ठेवल्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास कारमधून पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांची कार जप्त केली.
हनीट्रॅपमध्ये अनेकांना अडकवल्याची शक्यताबड्या घरातील तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांच्यासोबतचे शारीरिक संबंध साथीदारांच्या मदतीने चोरून चित्रण केल्यानंतर त्याआधारे त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या टोळीतील मुख्य आरोपी राजू सहानी आणि तरुणी असल्याचे सहायक निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. हे आरोपी पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांना अशा प्रकारे हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले असावे, असा संशय आहे.
पैसे आणण्यासाठी देणार होते प्रत्येकी ३० हजारराजू सहानी आणि तरुणीने तक्रारदार यांच्याकडून ब्लॅकमेलिंगचे तीन लाख रुपये घेण्यासाठी दोन तरुण विद्यार्थ्यांना पाठविले. ही रक्कम आणून देण्यासाठी त्यांना ३० हजार रुपये देण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. पैशाच्या आमिषाला बळी पडून कारमधून आलेल्या तीन जणांपैकी दोन जण एमजीएम कॅम्पसमधील वॉचमनच्या अंधाऱ्या खोलीत मोबाईल बॅटरी चमकावत पैसे घेण्यासाठी गेले. यावेळी पोलिसांनी विश्वनाथला पकडले. दुसरा आरोपी साथीदाराच्या कारमध्ये बसून मध्यवर्ती जकात नाक्याच्या दिशेने पळून गेला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून रस्त्यात कार सोडून ते पळून गेले होते. नंतर पोलिसांनी कृष्णाला अटक केली.