मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज माफियांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळींवर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मलबारी टोळीच्या मुसक्या आवळल्या नंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्जचा पुरवठा करणारा मोठा वितरक पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील कामा रोडवर सबीर हनिफ खान (वय 32) हा अमली पदार्थ विरोधी पथकाला आढळला. त्याच्या हातात एक बॅग होती आणि त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खैरे आणि त्यांच्या पथकाने चौकशी केली असता त्याच्याजवळ तब्बल 1 किलो 5 ग्रॅम एमडीचा साठा सापडला असून २० लाख इतकी त्याची किंमत आहे.