नालासोपारा : - बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले आहे. सदर आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या बँकांची ९ एटीएम कार्ड व मोबाईल फोन असा १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यात दररोज कुठे ना कुठे एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना घडत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यांना आळा घालून आरोपींना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना अश्या आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणावरून बुधवारी रात्री तुषार कोठारी (३०) या आरोपीला पकडले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा विरार येथील १ आणि नयानगर येथील २ असे तीन गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला आहे. सदर आरोपी विरुद्ध गुजरात व महाराष्ट्र राज्यात एटीएम अदला बदली करून फसवणुकीचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास आणि कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने विरार पोलिसांना आरोपीचा ताबा दिला आहे.