ठाणे: एका २३ वर्षीय तरुणीशी असलेल्या मैत्रिचा गैरफायदा घेत वाढदिवसाच्या निमित्ताने घरात बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गणेश उर्फ जितू अशोक सुरवसे (३३, रा. दिवा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी मंगळवारी दिली.
कळव्यातील या पिडितेशी मुळचा सोलापूर येथील रहिवाशी असलेल्या आरोपी गणेश (सध्या रा. दिवा) याने मैत्री केली होती. त्यानंतर याच मैत्रिचा गैरफायदा घेत तिला वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या घरी बोलविले. शीतपेयाच्या नावाखाली तिला गुंगीकारक मद्य पिण्यासाठी दिले. गुंगीत असतानाच तिच्यावर त्याने जबरदस्तीने बलात्कारही केला. याच वेळी त्याने तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले. या प्रकारामुळे तिने नंतर त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र, तेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचा केला. तिचे जानेवारी २०२२ मध्ये लग्न ठरत असतांनाच पीडित तरु णीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून त्यावरून आक्षेपार्ह फोटो आणि मेसेजही व्हायरल केले. त्याचबरोबर बदनामीकारक मजकूरही तिच्या मित्रांसह नातेवाईकांना पाठवून तिचे लग्न मोडण्याचाही प्रयत्न केला. १९ मार्च २०२२ रोजी तर त्याने त्याच्याकडील मोबाईलमध्ये असलेला तिचा फोटो संपादित करुन त्यावर ‘सेक्स चॅट आणि व्हिडिओ कॉल’ असा मजकूर टाकून तो फेसबुकवर प्रसारित केला. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या पीडित तरु णीने अखेर या नराधमाच्या छळास कंटाकून कळवा पोलीस ठाण्यात बलात्कारासह धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याने तिला त्रास देणे सुरुच ठेवले.पोलिसांनाही फोन करुन त्याने हैराण केले. तो कर्नाटक राज्यातून हे सारे प्रकार करीत होता. शिवाय, वारंवार त्याचे सिम कार्ड बदलून आपले राहण्याचे ठिकाणही बदलत होता.
क्राइम :पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं ठरणार बलात्कार? सुप्रीम कोर्ट घेणार कायद्याचा आढावा
अखेर तो गोव्यात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, सुदेश आजगावकर आणि पोलीस उपनिरीक्षक किरण बघडाणे आदींच्या पथकाने त्याला ८ मे २०२२ रोजी अटक केली. त्याने अशाच प्रकारे अन्यही दोन महिलांशी अशाच प्रकारे वर्तन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.