मंगेश कराळे
नालासोपारा :- मागील भांडणाचा राग मनात धरून २१ वर्षीय तरुणाचा खून करून मागील आठ वर्षांपासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
तुळींज येथे १८ मार्च २०१६ साली सुभाषचंद्र उर्फ भालू रामसागर गुप्ता (२१) याचा शिवाभैया, रवि श्यामवीर डांगुर, अभिजित मिश्रा उर्फ कडा उर्फ सचिन आणि कृष्णा कमलेश दुबे या चार मित्रांनी आपसात संगनमत करत दारू पाजून नायलॉन रश्शीने गळा दाबून खून केला होता. त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या ईरादयाने गोणीत भरुन त्याचे अंगावर असलेल्या सोन्याची चेन व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी व दुचाकीचा अपहार करुन आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून १ अल्पवयीन व २ असे ३ आरोपींना अटक केली होती. पण मुख्य आरोपी शिवाभैया हा फरार होता. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयांतील पाहीजे व फरार निष्पन्न परंतु नजेराआड असणारे आरोपींचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरीष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे तुळींज पोलीस ठाण्यातील या गुन्हयाचे तपास व अटक केलेल्या आरोपींची माहिती प्राप्त केली.
मुख्य पाहीजे आरोपी व गुन्हयाचे घटनेच्या प्रकाराबाबत सविस्तर माहीती प्राप्त करुन तो यूपी येथील राहणारा असुन त्याचे हातावर असलेल्या टॅटुचे आणि बरेच वर्षापुर्वीचा जुना अस्पष्ट फोटो प्राप्त केला. आरोपीचा फोटो आणि त्याचे हातावरील टॅटुचे वर्णनावरुन शोध चालू झाला. प्राप्त जुना फोटो आणि टॅटुचे वर्णनाशी मिळता-जुळता व्यक्ती मजरा चिल्लीमल याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोनचे तपास पथक चित्रकुट येथे रवाना करुन आरोपीला २७ ऑगस्टला ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केल्यावर त्याने ८ वर्षांपूर्वी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवबाबु उर्फ शिवाभैया जगतपाल निषाद (२०) असे आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक राजेश कुमार राय, महेंद्रकुमार यांनी केली आहे.