मुंबई: नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका ठकसेनाला हैदराबाद येथून पकडण्यात डोंगरी पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद झाकीर जहिरुद्दीन (वय ३६) असे त्याचे नाव असून त्याला घेवून पथक मंगळवारी रात्री मुंबईत परतले. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून पोलिसांनी कौशल्याने तेथील पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.
ऑनलाईन जाहिराती देवून फसवणूक करणाऱ्या झाकीरविरुद्ध एका नागरिकाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्याच्यावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र झाकीर हा मोबाईल फोन बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याचप्रमाणे तो वारंवार वास्तव्याचे ठिकाण समजत नव्हते. अखेर तांत्रिक कौशल्याचा वापर करुन तो हैदराबादेत असल्याचे उघडकीस आणले. त्यानंतरही त्याला पकडण्यासाठी उपनिरीक्षक अविनाश आरडक, कॉन्स्टेबल गायकवाड, साबळे हे गेले होते. तेथील नागरिकांनी पोलिसांना विरोध केल्याने त्याने तेथून पलायन केले. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या सहकाऱ्याने त्याचा शोध घेण्यात आला. झाकीरला एक तोतया तरुणीला गिऱ्हाईक बनवून त्याला एका हॉटेलमध्ये बोलावून तेथे पकडण्यात आले.