मुंबई - घरात ठेवलेले दागदागिने आणि रोकड असा २८ लाखांहून अधिक मुद्देमाल चोरणाऱ्या दोन मोलकरणींना सांताक्रुज पोलिसांनीअटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. स्नेहा ऊर्फ मंदा दुबय्या ऊर्फ रवी श्रीपल्ली (४०) आणि कमल गोपाळ वाघे (२७) असं अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
सांताक्रूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे क्रिषिराज खतुरिया (४३) यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दागदागिने, रोख रक्कम, परदेशी चलन, असा एकूण २८ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांच्या इमारतीत आणि इतर ठिकाणी घरकाम करणारी स्नेहा हिने मुद्देमाल चोरल्याचे दिसून आले. सांताक्रुज पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध सुरू केला.
खबऱ्याकडून स्नेहा ही सांताक्रूज शबरी हाॅटेल, स्टेशन रोड या ठिकाणी तिची साथीदार असलेल्या महिलेला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून स्नेहाला ताब्यात घेत तिला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. नंतर खतुरिया यांच्या घरात काम करणारी स्नेहाची मैत्रीण कमल हिच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार, कमल हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालापैकी २८ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघींनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.