मुंबई - १ कोटी ७० लाखाची व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्यास आलेल्या इसमास घाटकोपर पोलिसांनीअटक केली आहे. अटक आरोपीचे नाव राहुल कृष्णाजी दुपारे (५३) असं आहे.
विद्याविहार पश्चिमेकडील कामालेन येथे एका इसम बेकायदेशीररित्या व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्यास येणार असणाऱ्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना प्राप्त झाली होती. या माहितीनुसार पथक तयार करण्यात आले होते. या कारवाईसाठी वन अधिकारी यांची मदत घेण्यात आली आणि सापळा लावण्यात आला होता. १५ जून ५. ५० वाजताच्या सुमारास या दुपारे या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या कापडाची पिशवीची तपासणी केली असता त्यात १ किलो १३० ग्राम वजनाचा गोलाकार आकाराचा काळसर रंगाचा दगडासारखी दिसणारी वस्तू दिसली. ही वस्तू व्हेल जातीच्या माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस असल्याचं वन अधिकारी यांनी ओळखून सांगितले. या १ किलो १३० ग्राम वजनाच्या व्हेल जातीच्या माशाची उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी ७० लाख इतकी किंमत आहे.
त्याचा वापर सुगंधी द्रव्य आणि औषध बनविण्यासाठी केला जातो आणि हा पदार्थ देव माशाच्या तोंडून बाहेर पडत असल्याने ते जवळ बाळगल्यास किंवा घरात ठेवल्यास संपत्ती येते अशी धारणा असल्याचे आरोपीने सांगितले. आरोपी राहुलविरोधात वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२, कलम २, ३९, ४४, ४८ - अ, ४९ - ब सह कलम ५७, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.