मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईपोलिसांनी १४४ आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अंधेरी परिसरात पोलिसांनी विकास अटवाल, राॅबीन दास या दोघांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांनी अंधेरी येथे त्रिकुटाला बेकायदेशीर शस्त्रांसह अटक केली आहे. सचिन राजेंद्र यादव (२५), दीपक दलाई जैस्वाल (२९) आणि रवी उर्फ अमर अंदेशप्रताप सिंग (२९) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.
यादवकडून ७.६५ एमएमची पिस्तूल, जैस्वालकडून दोन मॅगझीन आणि चार जिवंत काडतुसे तर रवीकडून ७.६५ एमएमची पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख यालाही पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीत परिसरात काहीजण घातक शस्त्र घेऊन लूट करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरी येथील एम.ए.रोडवर पाळत ठेवून संशयित हालचालीवरून राॅबीन दास याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसं आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो मूळचा कोलकत्ताचा रहिवाशी असल्याचे सांगून शस्त्र तस्करीसाठी मुंबईत आल्याचं सांगितले. दुसरीकडे विकास अटवाल याला देशी कट्टासह जोगेश्वरीच्या आनंदनगर येथील पाटीलपूत्र येथून अटक केली आहे. तसंच ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख याला देशी कट्टा आणि काडतुसासह अटक केली आहे. शस्त्र घेऊन मोहम्मद रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्याला अटक केली. मोहम्मदने हे शस्त्र कशा करता आणले होते याची पोलीस माहिती घेत आहेत.