ठाणे : नवी दिल्ली येथील सराफाचा विश्वास संपादन करून दोन किलोच्या सोन्याचे बार एका सराफाकडून घेतल्यानंतर त्याच्या बँक खात्यात पैसे वळते करण्याचा बहाणा करून पसार झालेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली.
गुजरात येथील वजय सोनी (५०, रा. वरादगाव, जि. सिल्होड, गुजरात) याने नवी दिल्लीतील बिडनपूर येथे ‘शुभम गोल्ड अॅण्ड सिल्व्हर’ या नावाने तीन महिन्यांपूर्वी ज्वेलर्सचे दुकान सुरू केले होते. त्याने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. अशाच प्रकारे२६ आॅक्टोबर २०१९ रोजी कृष्णदेव खुपकर (रा. करोलबाग, नवी दिल्ली) यांना त्याच्या दुकानात ८५ लाखांचे दोन किलो सोन्याच्या बारसह त्याने बोलावून घेतले. हे सोने त्याने स्वत:च्या ताब्यात घेऊन खुपकर यांना त्याच्या दुकानात बसवून ठेवले. बँकेत जाऊन पैसे तुमच्या खात्यात वळते करतो, असे सांगून साथीदार बंटी उर्फ लक्की याच्यासह निघून पसार झाला. त्याचा मोबाइलही बंद करून ठेवला. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मूळचे महाराष्ट्रातील सांगलीतील विटा येथील रहिवासी असलेल्या खुपकर यांनी त्याच्याविरुद्ध करोलबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ही कैफियत खुपकर यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे ७ फेब्रुवारी २०२० रोजी मांडली होती. त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच खबऱ्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने शोध घेतला. त्याच माहितीच्या आधारे त्याला १० मार्च रोजी दुपारी १२च्या सुमारास विजय सोनी उर्फ विजय मगनलाल झवेरी याला ठाण्यातील मासुंदा तलाव भागातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बोईसर आणि सुरत येथेही गुन्हे दाखल आहेत.अनेक गुन्ह्यांमध्ये वॉण्टेडदिल्लीतील दोन किलो सोने अपहार प्रकरणात तो वॉण्टेड होता. तसेच नागपूर येथेही त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. तर लोकमान्य टिळक मार्ग येथील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. त्याला आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बोईसर येथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणातही त्याने ठाणे कारागृहात दोन वर्षे शिक्षा भोगली आहे. तर गुजरातला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणात तो जामिनावर सुटला आहे.