ठाणे : येऊरच्या जंगल परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगवलेल्या गवतावर विषारी औषधी (रसायने) फवारणी करून गवत खाणारे हरीण, काळवीट, चितळ आदींना नष्ट करून वन जमीन बळकवण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ठाण्याच्या डोंगरीपाडा येथील रहिवाशी युवराज गावंडा (24) या आरोपीस वन अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून गुरुवारी अटक केली आहे.
संजय गांधी उद्यानातील वन जमिनीवर उगवलेले गवत, झाडे झुडपे आदींवर गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान आरोपी विषारी औषधी फवारत असल्याचे लक्षात आले. याशिवाय सोशल मीडियावरही त्याची चित्रफीत व्हायरल झाली असता वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. आरोपीने औषधी फवारलेल्या जागेच्या बाजूलाच हरीण, चितळांचा कळप गवत, झाडपाला खात असल्याचे आढळून आला. या आरोपीने या वन्यजीव नष्ट करण्याच्या उद्देशासह वनजमीन बळकवण्याच्या हेतून विषारी औषधी गवत व झाडाझूडपांवर फवारणी केल्याचा आरोपाखाली आरोपीस वनाधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे, असे येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.
येऊर जंगल परिसरात घडलेल्या या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक वनसंरक्षक डी.एम. दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ वनाधिकारी विकास कदम, सुजय कोळी, रमाकांत मोरे, सुशिल रॉय, वनरक्षक राजन खरात, अमित राणो,संजय साबळे, दिनेश पाटील, केशव बनसोडे आदींनी आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.