राजेंद्र शर्मा
शिरपूर : शहरातील दोन महाविद्यालयीन युवती चामुंडा मातेच्या दर्शनासाठी जात असताना मागून एका दुचाकी गाडीवर आलेल्या २ इसमांनी एकीच्या हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून पसार झाले होते. शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या दोघांना जेरबंद करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
२९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास द्रव्या रवींद्र पाटील (१८) व मैत्रीण देवयानी रवींद्र बोरसे व इतरांसोबत करवंद नाक्याजवळील चामुंडा मातेच्या दर्शनासाठी मोबाइलवर बोलत-बोलत निघाली होती. मागून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी तिचा मोबाइल हिसकावून तेथून धूमस्टाइलने फरार झाले. याबाबत शिरपूर पोलिसांत अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शिरपूर पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी दिसून आल्याने अवघ्या काही तासांतच दोघांना मांडळ गावाच्या गेटजवळ दिलीप सुदाम कोळी (२४) आणि तुकाराम गोविंद ढिसले-मराठे (३५, दोन्ही रा. वाल्मीकनगर, शिरपूर) यांना पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून ८ हजारांचा मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली ४० हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ एल. व्ही. चौधरी हे करीत आहेत.
सराईत गुन्हेगार कोळीवर १७ गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला दिलीप कोळी (रा. वाल्मीकनगर, शिरपूर) याच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्याविरोधात चोरीचे ५ गुन्हे, घरफोडीचे ३, जबरी चोरीचे २, दोंडाईचा पोलिसांत चोरीचा १, अमळनेर पोलिसांत चोरीचा १, अडावद पोस्टेला चोरीचा १, नंदुरबार तालुका पोस्टेला चोरीचा १, शहादा पोस्टेला चोरीचा १, गुजरात राज्यात कडोदरा पोस्टेला चोरीचा १, मालेगाव पोस्टेला चोरीचा १ असे एकूण १७ गुन्हे जबरी चोरी, दुचाकी चोरी, चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, डीबी पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंखे, मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी, आकाश पावरा यांच्या पथकाने केली.