मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणुक करणाऱ्या सराईत दुकलीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी ८ गुन्ह्यांची उकल केली असून चोरीचे १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
विरार येथील साईनाथ नगरच्या प्लाझा इमारतीत राहणारे रामचंद्र कृष्ण बिरंगोळे (६५) हे १८ ऑगस्टला सकाळी साडेअकराच्या सुमारास साईबाबा मंदिरासमोर, फुलपाडा रोड येथे उभे होते. त्यावेळी तुम्ही चहा पिता का असे विचारुन व पाया पडून दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली होती. विरार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून बतावणी/ फसवणुकीचे प्रकारात वाढ झाल्याने वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे देण्यात आला. गुन्हयाचा तांत्रिक विश्लेषण व माहिती प्राप्त करुन आरोपी रमेश ऊर्फ रम्या विजयकुमार जैसवाल (४६) आणि विशाल ऊर्फ बल्ला ऊर्फ बाळू विष्णू कश्यप (२८) या दोघांना ताब्यात घेऊन तपास केल्यावर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने २६ ऑगस्टला अटक केली. आरोपीकडे पोलीस कोठडीत दरम्यान फसवणुक केलेले १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींकडून पोलीस आयुक्तालय, मुंबई, ठाणे येथील ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी विरुध्द अशाच प्रकारे मुंबई, ठाणे शहर, मिरा भाईंदर- वसई विरार आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपी विरारच्या पोलीस कोठडीमध्ये आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, अभिजित टेलर, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.