मीरा रोड - पावणे १४ लाखांचे दागिने चोरणाऱ्या दागिन्यांना डिझाईन करून देणाऱ्या कारखान्यातील कारागिरास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी २४ तासांत मालाड येथून मुद्देमालासह अटक केली आहे. जोखमीचे काम असून देखील कारखाना मालकाकडे आरोपी कारागिराचा पत्ता तर सोडाच पूर्ण नाव देखील नव्हते. मधुसूदन घोष यांचा भाईंदर पूर्वेला सोने व हिऱ्याच्या दागिन्यांना डिझाईन करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारखान्यांमध्ये दागिन्यांना डिझाईन करण्यासाठी त्यांनी बिश्वनाथ नावाच्या कारागिरास कामावर ठेवले होते.
घोष यांनी १० सप्टेंबर रोजी बिश्वनाथकडे १३ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोने व हिऱ्याचे दागिने डिझाईन करण्यासाठी दिले होते. परंतु बिश्वनाथ हा सदरचे दागिने घेऊन ११ सप्टेंबर रोजी पळून गेल्याने घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संदीप मोहोळ सह रविंद्र भालेराव, ऐनुद्दीन शेख, संदीप जाधव, युनुस गिरगावकर व अमित कुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. गंभीर बाब म्हणजे मौल्यवान दागिन्यांचे काम असताना घोष यांनी बिश्वनाथ याला कामावर ठेवताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी तर सोडाच त्याचे पूर्ण नाव, पत्ता व कोणतेही ओळखपत्र घेतले नव्हते.
पोलिसांनी गुन्ह्याचा तांत्रिक दृष्टीने तपास करून बातमीदारांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात आरोपीची माहिती मिळवली व त्याला मालाडच्या मालवणी येथील आंबोजवाडी झोपडपट्टीतून अटक केली. आरोपीकडून चोरीचे सर्व सोन्याचे व हिऱ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या घटने नंतर मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील व्यवसायिकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव, सध्याचा व गावचा पत्ता, ओळख पत्र व फोटो आदी सर्व माहिती घ्यावी असे आवाहन पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.