नालासोपारा - एटीएम सेंटरमधून पैसे काढून देताना हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. यात ८ गुन्ह्यांची उकल करून विविध बँकेची ६० एटीएम कार्ड, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा, दुचाकी असा एकूण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक आरोपी मालिका, वेबसीरिज आणि क्राईम पेट्रोलमधील कलाकार असून कोरोनाच्या काळात काम मिळत नसल्याने चोर बनला असल्याचे उघड झाले आहे. (Artist of crime patrol became a thief, police arrest him & solving eight crimes)आयुक्तालयाच्या परिसरात एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. यामुळे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्यासाठी आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना या टोळीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या युनिटच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमने धर्मेंद्रकुमार दुबे (४०), अजय शर्मा (३३), बबलू सरोज (३५), जितेंद्रकुमार चमार (२४) आणि ब्रिजेश चौहान (२२) या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर विविध बँकेचे ६० एटीएम कार्ड्स, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा, दुचाकी असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून विरार ३, तुळींज १, वालीव १, नारपोली १, कापूरबावडी १, भिवंडी शहर १ अशी ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच या टोळीने वालीव, विरार, ठाणे, भिवंडी, मुंबई, डुंगरा, वापी, गुजरात या ठिकाणी गुन्हे केल्याचे चौकशीत सांगितले आहे. आरोपीपैकी अजय शर्मा हा टीव्ही कलाकार असून त्याने क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, गणेशा, या मालिकांमध्ये व काही वेब सीरिजमध्ये काम केलेले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला पकडले आहे. त्यांच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करून विविध कंपनीचे ६० एटीएम कार्ड जप्त केले असून एक आरोपी टीव्ही कलाकार आहे. आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी विरार पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. - प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट-३