पुणे - शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेशी माओवाद्यांच्या संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार मंगळवारी न्यायालयात केली.अरूण फरेरा, व्हर्णन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. तपासात त्यांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील तपासासाठी त्यांची ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार तिघांनाही विशेष न्यायाधीश आर.व्ही.आदोने यांनी १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयात फरेरा यांनी पोलिसांविरुद्ध मारहाणीची तक्रार केली. माझ्यासह गोन्साल्विस व भारद्वाज यांना ४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी स्वारगेट येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. तेथे एकटेच असलेल्या शिवाजी पवार यांनी माझा चष्मा काढून १० ते १२ वेळा कानाखाली मारले. त्यामुळे मी तोंड सुजल्याची तक्रार केली होती. मला ससून येथे नेऊन तपासण्यात आले होते, असे फरेरा यांनी सांगितले.फरेरा यांचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. डॉ. शिवाजी पवार बाहेरगावी असल्याने सुनावणीसाठी हजर राहू शकले नाही.
अरुण फरेरा यांना पोलीस कोठडीत मारहाण; न्यायालयात केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:19 AM