आशिष गावंडे, अकोला: शहरातील दगडी पूलानजिकच्या चार जीन परिसरातील व्यावसायिक अरुणकुमार मगनलाल वाेरा (६२) यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या घटनेला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेला असला तरी पाेलिसांना अपहृत व्यावसायिक वाेरा यांचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेतील अपहरणकर्त्यांचाही मागमूस लागत नसल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी परिसरातील पथदिवे बंद असल्याने व सीसीटीव्हीचा मागमूस नसल्याचे पाहता अपहरणाचा कट पूर्वनियाेजित असल्याचा संशय बळावला आहे.
रामदास पेठ पाेलिसांच्या हद्दीत येणाऱ्या दगडी पूल परिसरातील चार जीन भागातील रहिवाशी अरुणकुमार मगनलाल वाेरा यांचा काचेच्या बाॅटल खरेदी,विक्रीचा माेठा व्यवसाय आहे. चार जीन मधील त्यांच्या गाेडावूनमध्ये अनेक महिला व पुरुष कामावर असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात अनेकांची कायम वर्दळ राहत असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी (साेमवार १३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास वाेरा त्यांचे कामकाज आटाेपून घरी परत जाण्यासाठी निघाले हाेते. ते त्यांच्या गाडीजवळ पाेहाेचत नाहीत ताेच एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दबा धरुन बसलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडून जबरदस्तीने वाहनात काेंबून जागेवरुन पळ काढला. यादरम्यान, वाेरा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाेलिसांना सांगितले. या झटापटीत अरुणकुमार यांचा माेबाइल जमिनीवर काेसळला. हा माेबाइल पाेलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाेरा यांचे पुतणे जिग्नेश प्रवीणकुमार वाेरा (४५ रा.राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ अकाेला) यांनी साेमवारी रात्री उशिरा रामदास पेठ पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पाेलिसांनी भादंवि कलम ३६५,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबीयांची घालमेल वाढली!- अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणाला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांच्या कुटुंबियांना अपहरणकर्त्यांकडून काेणत्याही स्वरुपाची मागणी करण्यात आली नाही. हा प्रकार पाहता कुटुंबियांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. यामुळे तपास अधिकारीही काेड्यात पडले आहेत.
वाेरा यांच्याकडून अनेकांना मदत- शहरातील एका प्रतिष्ठीत व्यावसायिकाचे अपहरण झाल्याच्या घटनेने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अरुणकुमार वाेरा हे अनेकांना व्यवसायाकरीता आर्थिक मदत करीत असल्याची माहिती आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू व मदतीसाठी तत्पर राहत असल्यामुळे त्यांचे अपहरण कशासाठी केले असावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाेलिसांकडून आराेपींचा कसून शाेध- घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी यांनी आराेपींच्या शाेधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, रामदास पेठ पाेलिसांची काही पथके कामाला लावली आहेत. शहरवासियांना किंवा व्यावसायिकांना काही सुगावा किंवा माहिती असल्यास त्यांनी पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन ‘डीवायएसपी’सतीष कुलकर्णी यांनी केले आहे.