शिक्षकांनी दिलेला गृहपाठ जर मुलाने केला नाही तर त्याला ओरडतात किंवा काही शिक्षक मुलांना शिक्षा म्हणून मारतात असं अनेकदा दिसून आलं आहे. पण अनेक वेळा शिक्षक मुलाला क्रूर किंवा अत्यंत मोठी शिक्षा करतात. अशा काही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बिहारमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एका शिक्षकामुळे मुलाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
बिहारमधील अरवल जिल्ह्यातील एका शाळेत गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका मुलाला शिक्षकाने मारहाण केली. मारहाणीत १२ वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्ह्यातील उमराबाद भागातील एका खासगी शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे. जखमी झाल्यानंतर मुलाला पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विद्यार्थी अमित राजने दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी शिक्षकांनी मी गृहपाठ न केल्याने मला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे माझ्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मी माझ्या पालकांना सांगितलं आणि त्यांनी मला लगेचच रुग्णालयात उपचारासाठी नेलं. कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलाला विशेष काळजी घेण्यासाठी पाटणा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. डोळ्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
अरवलचे एसपी राजेंद्र कुमार भील यांनी या घटनेबाबत सांगितलं की, अमितच्या कुटुंबीयांनी रविवारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत शाळा प्रशासन आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोषीला सोडले जाणार नाही आणि त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.