अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत आज हायकोर्टाकडनं जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत. निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्टाने सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सत्र न्यायालयात पोहोचली आहे आणि तिने सही केली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ५ वाजून १० मिनिटांनी सत्र न्यायालयातून आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने जामिनाची प्रत घेऊन निघाले. मात्र, आर्थर रोड जेलची जामीन प्रत स्वीकारण्याची वेळ उलटून गेल्याने आजची रात्र देखील आर्यनला आर्थर तुरुंगात घालवावी लागणार आहे.
त्यामुळे आर्यन खानची जेलमधून सुटका उद्या २७ दिवसांनी आपल्या घरी रवानगी होण्याची शक्यता आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने सर्वांना नियम सामान असून कुणासाठीही वेळेत बदल होणार नाही असे म्हटले आहे. सुटकेसाठी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत रिलीझ ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष टाकावी लागते. यासाठी तुरुंग अधिकारी 5.35 वाजेपर्यंत थांबतात अशी माहिती आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली.शाहरुख खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, जुही चावला आर्यनला लहानपणापासून ओळखते. त्यामुळे जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला आल्या आहेत. पुढील प्रक्रियेसाठी अजून १ तास तरी लागेल. १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खान तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये. तसेच आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत.