आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी आज सुरु होती. आर्यनतर्फे युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आता अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना हे हजर होते. अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी घेण्यात येणार आहे.
आज युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही असे हायकोर्टाला सांगितले आहे.
ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी एनसीबीने मांडलेल्या कट करस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल विशेष एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीच्या दाव्याप्रमाणे, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. मात्र, त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. शिवाय त्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट करस्थानाचा भागच नाही असा युक्तिवाद केला.
आज देखील कोर्टात गर्दी
आज पुन्हा कोर्टात वकिलांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोर्टात प्रवेश मिळवण्यासाठी कोर्टाबाहेर पोलिसांसोबत वकिलांची हुज्जत घातलेली देखील पाहायला मिळाली.
दोन सहआरोपींना काल झाला होता जामीन मंजूर
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांची जामिनावर सुटका केली आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशी या दोन सहआरोपींची नाव आहेत. या दोघांना कोर्टाने ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन आरोपी आहेत.