मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. काल एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एस्प्लेनेड कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता सुनावणी सुरु आहे. मात्र, काल काही कारणास्तव एक रात्र तुरुंगाऐवजी आर्यनसह इतर आरोपींना एनसीबी कार्यालयात काढावी लागली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आलं आहे. ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये त्यांना ठेवण्यात येईल.
आर्यनसह इतर आरोपींना कालची रात्र देखील तुरुंगात काढावी लागणार होती. मात्र, तुरुंग प्रशासन कोरोना नियमांमुळे नव्या कैद्यांना स्वीकारणार नसल्याने एक रात्र न्यायालयीन कोठडी म्हणून एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी कोर्टाला उद्याचा दिवस आरोपींना एनसीबीच्या कोठडीत राहू द्यात अशी विनंती केली होती. नव्याने अटक केलेल्या अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन साहू अशी या आरोपींना मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.