बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) आजची रात्र तुरुंगात घालवावी लागणार आहे. न्यायालयाने आर्यन खानसह तिघाजणांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित 5 जणांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Aryan Khan in NCB Custody for one day.)
एनसीबीने आज सायंकाळी आर्यनसह आठजणांना अटक केली. तिघांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली.
मात्र, न्यायालयाने तिघांचीही उद्यापर्यंत एनसीबीला कोठडी दिली आहे. यामुळे आर्यन खानसह तिघांना आजची रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे. तसेच अन्य ५ आरोपींना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा आणि त्याच्या कारवाईनंतर नेणारा व्यक्ती कोण होता याचे गूढ अद्याप कायम आहे. सगळीकडे या ऑपरेशनची चर्चा असताना एका सेल्फीनेही सोशल मीडियावर धूम माजविली होती. एनसीबीने कारवाई आधी त्या पार्टीमध्ये आपली माणसे पेरली होती, हा तो अधिकारी होता. ज्याने डमी म्हणून रेव्ह पार्टीत प्रवेश केला आणि भांडाफोड केली, असे बोलले जात होते. यावर एनसीबीने खुलासा केला आहे. आर्यन खानला (Aryan Khan) स्पॉट करताना एका व्यक्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. हाच व्यक्ती आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नेताना दिसत होता. यामुळे साऱ्यांनी तो एनसीबीचा अधिकारी किंवा अंडरकव्हर अधिकारी असेल असा कयास बांधला होता. परंतू एनसीबीने त्या सेल्फीमधील जो व्यक्ती आहे तो एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.