मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई नेमकी कशी गेली याबद्दलचा तपशील आता समोर आला आहे.
क्रूझवर ड्रग पार्टी होणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्रूझची तिकिटं काढली. क्रूझवरील रेव्ह पार्टी दरम्यान तिथे १३०० ते १४०० जण उपस्थित होते. मात्र एनसीबीकडून ८ ते १० जणांचा शोध सुरू होता. तशी टीप त्यांना मिळाली होती. यामध्ये आर्यन खानच्या नावाचा समावेश होता. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्याची जबाबदारी एका विशेष अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या नावानं क्रूजवर कोणत्याही खोलीचं बुकिंग नव्हतं. मात्र आयोजकांनी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसाठी खास खोली ठेवली होती. ही सोय क्रूजवर आयोजकांनी स्वत: केली होती. आर्यन आणि अरबाज त्या खोलीत जात असताना अचानक एनसीबीचे अधिकारी दोघांच्या समोर आले. त्यांनी दोघांना खोलीत प्रवेश करण्यापासून रोखलं. दोघांची झडती घेण्यात आली. त्यात आर्यन खानकडे काहीही सापडलं नाही. पण अरबाजच्या बूटांमध्ये चरस आढळून आलं.
यानंतर अधिकाऱ्यांनी दोघांचे फोन जप्त केले. त्यांचे चॅट्स तपासण्यात आले. त्यात दोघे चरस घेण्याबद्दल बोलत होते. एनसीबीनं आर्यनचा जबाबदेखील नोंदवला. त्यात त्यानं हीच बाब एनसीबीला सांगितली. आर्यन आणि अरबाज ड्रग विक्रेत्याच्या सातत्यानं संपर्कात होते. त्याचा शोध अनेक दिवसांपासून एनसीबी करत आहे. प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या हाती आणखी एक यश लागलं. मुंबईतून रविवारी रात्री उशिरा एका अंमल पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे.