मुंबई – ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याला अटक झाल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण देशभरातील मीडियामध्ये चांगलेच गाजले. आजही मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी(Mumbai Cruise Drugs Party) प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. NCB नं क्रुझवर छापेमारी करत यात ८ जणांना अटक केली. परंतु NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत वसुली करत असल्याचे गंभीर आरोप लावले.
NCB च्या चांडाळ चौकडीने निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकल्याचा दावा मलिकांनी केला. आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुखकडून वसुली करण्याचं प्लॅनिंग होतं असंही मलिक म्हणाले. नवाब मलिक सातत्याने या प्रकरणात आरोप लावत असल्याने NCB ने SIT नेमली. त्याचसोबत महाराष्ट्र पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT गठीत केली. राज्य पोलिसांच्या SIT चौकशीत काही लोक NCB च्या नावाखाली वसुलीचं रॅकेट चालवायचे असा खुलासा झाला आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) च्या नावावर काहीजण वसुली करायचे हे कळालं आहे. त्यात प्रमुख नाव किरण गोसावी(Kiran Gosavi) समोर आलं आहे. किरण गोसावी आणि त्याचे काही साथीदार स्वत:ला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत वसुली करायचे. किरण गोसावीनं मोठ्या चालखीने आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि त्यानंतर आर्यन खानची ऑडिओ क्लीप मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली.
इतकचं नाही तर जेव्हा आर्यन खानला NCB कार्यालयात आणलं गेले तेव्हा गोसावीला हे माहित होतं की त्याठिकाणी मीडियाही मोठ्या संख्येने आहे. त्या परिस्थितीचा फायदा घेत स्वत: आर्यन खानचा हात पकडून त्याने NCB कार्यालय गाठलं. जेणेकरुन टेलिव्हिजनवर तो NCB अधिकारी असल्याचं भासेल. त्यानंतर लोअर परेळ भागात किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिला भेटून तिला पुरावे दाखवले. जेणेकरुन तो NCB अधिकारी आहे आणि तो आर्यनला या प्रकरणातून बाहेर काढू शकेल असा विश्वास तिला वाटेल.
मुंबई पोलीस घेत आहेत कायदेशीर सल्ला
आता मुंबई पोलीस या चौकशीच्या आधारे किरण गोसावी आणि काही लोकांवर प्रिवेंशन ऑफ करप्शनचा गुन्हा नोंदवणार आहे त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीचं स्टेटमेंट तिची तब्येत खराब असल्याने रेकॉर्ड केले गेले नाही. परंतु या प्रकरणात अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे याचंही नाव समोर आलं आहे. परंतु तो कोरोना संक्रमित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे SIT चा तपास धीम्या गतीने सुरु आहे.