मुंबई:बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स पार्टीप्रकरणी (Cruise Drugs Party Case) अटक करण्यात आली आहे. आताच्या घडीला आर्यन आर्थर रोड तुरुंगात असून, त्याला सर्व सामान्य कैद्यांप्रमाणे राहावे लागत आहे. आर्यन खानच्या जामिनाबाबत अद्यापही कोणताही निर्णय देण्यात आला असून, या प्रकरणी आता २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, तोपर्यंत आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात राहावे लागणार आहे. यातच आता आर्यन खानचा कैदी क्रमांक ९५६ असून, घरुन त्याला ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आर्थर रोड तुरुंगात असलेल्या कैद्यांची ओळख ही त्यांच्या कैदी नंबरवरूनच केली जाते. तसेच ट्रायल सुरू असलेल्या कैद्यांना वेगळे नंबर दिले जातात. आताच्या घडीला आर्यन खानची ट्रायल सुरू असून, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. यासाठी आर्यन खानलाही कैदी नंबर देण्यात आला आहे. आर्यन खानचा कैदी नंबर ९५६ आहे. तसेच आर्यनला आर्थर रोड तुरुंगातील कँटिनमधील काही खाद्यपदार्थ खरेदी करायचे असतील, यासाठी त्याला ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर घरून पाठवण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे.
आर्यनला खावे लागतेय तुरुंगातील जेवण
आर्यन खानचा क्वारंटाइन कालावधी संपल्यामुळे त्याला अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला अन्य कैद्याप्रमाणेच तुरुंगातील जेवण देण्यात येते. अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. आर्यनला बाहेरील पदार्थ खाण्यास मनाई असली, तरी घरातील कपडे परिधान करण्याची मुभा आर्यनला देण्यात आली आहे. आर्यन तुरुंगात जेवण देण्यात येत असले तरीदेखील तो येथील कँटीनमधून काही पदार्थ खरेदी करतो. यात शक्यतो तो पाण्याची बाटली, बिस्कीटचे पुडे आणि स्नॅक्सची काही पाकिट खरेदी करत असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, सेशन कोर्टात दोन्ही पक्षाचे वकील दोन दिवस केवळ भांडत राहिल्यामुळे आर्यन खानच्या जामिनावरील निर्णय होऊ शकला नाही, असे सांगितले जात आहे. आर्यन खानला आणखी पाच दिवस तुरुंगात रहावे लागणार आहे. दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्तीवाद एवढा वेळ केला की अखेर न्यायालयाला निकाल देण्यासाठी विचार करण्यास वेळच मिळाला नाही. यामुळे दसरा, शनिवार, रविवारच्या सुट्या असल्याने न्यायालयाने निकाल थेट २० तारखेलाच देण्याचे जाहीर केले.