आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढवून मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयात याबाबत अर्ज सादर केला आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्यामुळे मुदतवाढ देण्याची तपास यंत्रणेकडून कोर्टाला विनंती करण्यात आली असून लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. कार्डिलीया क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत अनेक सेलिब्रेटी असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता.
NCB च्या एसआयटीने कार्डिलीया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी २ एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल करायचं होतं. मात्र, एसआयटीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयाकडे आणखी तीन महिन्यांचा म्हणजेच ९० दिवसांचा अवधी मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हा अर्ज सादर केला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत आर्यन खानसह १८ हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर ते देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.