बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. परंतू या कारवाईवर नंतर मोठे खुलासे झाले होते. वानखेडेंनी खंडणी उकळल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात प्रभाकर साईल पंच होता. त्याचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच राहिलेल्या प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंडारे यांनी ही माहिती दिली आहे. प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. चेंबुरच्या माहुल येथील घरी त्यांना हार्ट अॅटॅक आल्याचे ते म्हणाले.
आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. गोसावीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती असा आरोप साईल याने केला होता.