Aryan Khan Case : सॅम डिसोझाची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 09:06 PM2021-11-03T21:06:20+5:302021-11-03T21:06:59+5:30
Aryan Khan Case: Cruise Drugs प्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी के. पी. गोसावीने शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याकडून ५० लाख रुपये घेतले.
मुंबई : अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी आणि क्रूझवरील छापा प्रकरणातील पंच साक्षीदार के.पी. गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप असलेला सॅम डिसोझा याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी के. पी. गोसावीने शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याकडून ५० लाख रुपये घेतले. मात्र, एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याने ते पैसे पूजाला परत केले, असा दावा सॅमने अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. आर्यन याच्या ताब्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले नाही आणि तो निर्दोष आहे, अशी माहिती खुद्द गोसावीने मला दिली दिली, असे सॅमने अर्जात म्हटले आहे.
आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे. गोसावी आणि त्याचा अंगरक्षक प्रभाकर साईल हे या कटातील मुख्य सूत्रधार आहेत. आर्यनच्या सुटकेसाठी शाहरूखकडून १८ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबी अधिकाऱ्यांवर आहे. हा आरोप आपल्यावरही ठेवण्यात आला आहे, असे सॅम याने अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.
या आरोपांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. ‘एसआयटी’कडून अटकेची शक्यता असल्याने आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा किंवा अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सॅम याने अर्जाद्वारे केली आहे. आपल्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देण्यात यावी आणि अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी सॅम याने केली आहे.