मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीत आर्यन खानचं नाव आलं होतं. मात्र आता एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमध्ये आर्यनचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र चौकशीमध्ये आपण गांजा घेत असल्याचे आर्यन खान याने कबूल केल्याचे एनसीबीने आरोपत्रात नमूद केले आहे.
एनसीबीने शुक्रवारी मुंबईतील कोर्टामध्ये चार्जशिट दाखल केली होती. यामध्ये ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २० पैकी १४ जणांची नावं आहेत. मात्र आर्यन खानसह सहा जणांची नावं या आरोपपत्रामध्ये नाही आहेत, अशा परिस्थितीत आरोपपत्रामध्ये आर्यन खानने तो गांजाचं सेवन करत असल्याचं एनसीबीच्या चौकशीतून समोर आलं आहे.
आरोपत्रात नमूद असलेल्या माहितीनुसार आर्यन खानने आपल्या जबाबात सांगितलं की, त्याने २०१८ मध्ये अमेरिकेत असताना गांजा पिण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेमध्ये आर्यन खान तेव्हा कॉलेजचं शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याला निद्रानाशाचा त्रास होत होता. तेव्हा त्याने गांजा पिणे हे या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदतगार ठरू शकते, असे कुठेतरी वाचले होते.
दरम्यान, आर्यन खानच्या फोनमध्ये मिळालेलं व्हॉट्सअॅप चॅट त्यानेच केल्याचे आर्यन खानने मान्य केल्याचे एनसीबीने म्हटले आहे. आरोपपत्रानुसार आर्यन खानने एनसीबीला सांगितले की, तो मुंबईमधील वांद्रे येथील एका डिलरला ओळखतो. मात्र त्या डिलरचं नाव आणि आणि लोकेशन त्याला माहिती नाही. तो डिलर त्याचा मित्र अचित याच्या ओळखीचा आहे. दरम्यान, अचित यालाही ड्रग्स प्रकरणात पकडण्यात आले होते.