मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्यन खानला एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं असून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.
एनसीबीच्या वतीनं अनिल सिंह युक्तिवाद करत आहेत. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ९ दिवसांची एमसीबी कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं. 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत,' असा दावा सिंह यांनी केला.
'आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आली आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळायला हवी. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे. या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,' अशी माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली. आर्यनच्या चॅटमधून पैशांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे. बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं.
आर्यन खानला कशी झाली अटक? कसा रचला ट्रॅप?क्रूझवर ड्रग पार्टी होणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्रूझची तिकिटं काढली. क्रूझवरील रेव्ह पार्टी दरम्यान तिथे १३०० ते १४०० जण उपस्थित होते. मात्र एनसीबीकडून ८ ते १० जणांचा शोध सुरू होता. तशी टीप त्यांना मिळाली होती. यामध्ये आर्यन खानच्या नावाचा समावेश होता. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्याची जबाबदारी एका विशेष अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या नावानं क्रूजवर कोणत्याही खोलीचं बुकिंग नव्हतं. मात्र आयोजकांनी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसाठी खास खोली ठेवली होती. ही सोय क्रूजवर आयोजकांनी स्वत: केली होती. आर्यन आणि अरबाज त्या खोलीत जात असताना अचानक एनसीबीचे अधिकारी दोघांच्या समोर आले. त्यांनी दोघांना खोलीत प्रवेश करण्यापासून रोखलं. दोघांची झडती घेण्यात आली. त्यात आर्यन खानकडे काहीही सापडलं नाही. पण अरबाजच्या बूटांमध्ये चरस आढळून आलं.