लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांची शनिवारी सुटका करण्यात आली. ऑर्थर रोड कारागृहातून हे दोघेही आपापल्या घरी रवाना झाले. परंतु, याच प्रकरणात अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा ही मात्र अद्याप तुरुंगातच आहे. मुनमुन धमेचा ही मध्य प्रदेशची आहे. त्यामुळे तिला जामीनदार मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तिला शनिवारची रात्र कारागृहातच काढावी लागली आहे.
तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी मुनमुनच्या वकिलांना सुटीकालीन न्यायालयामोर हा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. याआधी उच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादावेळी मुनमुनचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी तिला झालेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला होता. रविवारी ती कारागृहाबाहेर पडू शकते.
कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे. त्याच्यासह, एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गोमित चोप्रा, नुपूर सतिजा, समीर सहगल, गोपाळजी आनंद, मानव सिंघल, भास्कर अरोरा, इश्मित सिंग चढ्ढा, श्रेयस नायर यांनाही जामीन देण्यात आला.
या आरोपींना जामीन मंजूर करताना रोख रकमेच्या जामिनावर सुटका करण्याची विनंतीही न्यायाधीशांनी मान्य केली. आतापर्यंत एकूण २० आरोपींपैकी १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे.एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी क्रूझवरील परतीच्या प्रवासानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने अटक केलेल्या अविन साहू व मनीष राजगढिया यांना जामीन यापूर्वीच मंजूर केला होता, तर गुरुवारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या एकूण २० आरोपींपैकी ११ आरोपींना आतापर्यंत जामीन मिळाला आहे. विक्रांत छोकर, मोहक जस्वाल, अब्दुल कादीर शेख, शिवराज हरिजन आणि दोन नायजेरियन नागरिक अजूनही याप्रकरणी अटकेत आहेत.