मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई क्रूझवरील ड्रग्ज रेव्ह पार्टीतून अटक केल्या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच प्रकाशझोतात आले होते. परंतू, आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्याच साक्षीदाराने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता वानखेडेंविरोधात मुंबई पोलिसांकडे विविध ठिकाणी ४ तक्रारी दाखल झाल्या असून प्रकरणाचे गांभिर्य पाहून याच्या चौकशीचा जबाबदारी एका एसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी पोलीस अधिकारी मिलिंद खेतले (Milind Khetle) हे करणार आहेत. सुत्रांनी सांगितले की, वानखेडेंविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांना फक्त तक्रारी मिळाल्या आहेत. वानखेडेंविरोधात कोणते आरोप करण्यात आले आहेत, हे सांगण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र, खेतले यांच्याकडून वानखेडेंवरील सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खेतले यांच्या चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याचा अहवाल राज्याच्या गृह मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. यानंतर तेथून आदेश आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
मुंबई पोलिसांच्या वकील सुधा द्विवेदी (Sudha Dwivedi) यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडेंसह अन्य पाच जणांविरोधात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथितरित्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल करण्याची तक्रार दाखल केली होती. यानुसार मुंबई पोलिसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली होती.
मंगळवारी रात्रीच प्रभाकरचा जबाब कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करण्यात आला. डीसीपी स्तरावकील अधिकाऱ्याने हा जबाब घेतला आहे. यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आधी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करणार आहे. प्रभाकर सैलने आपल्या आरोपांमध्ये ज्या लोकांची नावे घेतली आहे, ज्या जागांचा उल्लेख केला आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज काढले जाईल. याशिवाय प्रभाकरच्या लोकेशनची तपासणी केली जाणार आहे. प्रभाकरने ज्या ठिकाणी पैशांची देवाण घेवाण झाल्याचा दावा केला तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.