मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणावरुन गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अमली पदार्थ नियंत्रण कक्षानं (NCB) ड्रग्ज पार्टी उधळून लावत याप्रकरणात अटक केल्या गेलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोघांना कोर्टानं ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या सर्व आरोपींच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्याची तयारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत एनसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या छापेमारी संदर्भात गुप्तता बाळगण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
क्रूझवर छापा टाकून अटकेची कारवाई करणारी एनसीबी आता आणखी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत आहे. त्यासाठी दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे लवकरच एनसीबी मोठं ऑपरेशन करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या पथकानं क्रूझवर जाऊन धडक कारवाई केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे.
आर्यन खान आणि इतर आरोपींच्या चौकशीतून, त्यांच्या चॅटमधून काही जणांची नावं समोर येत आहेत. आरोपींची संख्या जास्त आणि मुंबईतील एनसीबीच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. आर्यन खानला विविध ठिकाणी नेऊन स्पॉट व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचीदेखील झडती घेतली जाऊ शकते.
क्रूझ प्रकरणातील आरोपींचं दिल्ली कनेक्शनएनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खान व्यतिरिक्त दिल्लीस्थित मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंह, मोहक जायसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा आणि अरबाज मर्चंट यांना अटक केली आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. या सर्वांचं राजधानी दिल्लीशी थेट कनेक्शन आहे.
कोणकोणत्या आरोपींचं आहे दिल्ली कनेक्शन?१. मुनमुन धमेचा: मुनमुन धमेचावर ड्रग्ज पार्टीत ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. ती एक दिल्ली स्थित मॉडल असून एका मोठ्या ब्रँडसाठी ती मॉडलिंग करते. ती मूळची मध्य प्रदेशची आहे. पण तिचं राहतं घर सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतील तिच्या निवासस्थानाची झडती घेतली जाऊ शकते.
२. इश्मित सिंह: इश्मित दिल्लीतील बड्या उद्योगपतीचा मुलगा असून तो या पार्टीत कसा पोहोचला याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. एनसीबीकडून त्याची चौकशी सुरू आहे.
३. मोहक जायसवाल: मोहक जायसवाल देखील दिल्ली स्थित एक मोठा व्यावसायिक आहेत. त्यांचं दिल्लीत घर असून त्यांच्याही घराची झडती घेतली जाऊ शकते.
४. गोमीत चोपडा: गोमीत हा एक प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आहे. दिल्लीच्या योजना विहार येथील तो रहिवासी आहे. गोमीतच्या आईनं नुकतीच एनसीबीच्या कार्यालयात येऊन त्याची भेट घेतली होती.
५. विक्रांत छोकर: विक्रांत छोकर दिल्ली स्थित एका खासगी कंपनीमध्ये प्रोडक्टिव्हिटी हेड पदावर कार्यरत आहे.
६. नुपूर सारिका: आरोपी नुपूर सारिका देखील एक मोठी उद्योगपती आहे. पार्टीत ती कुणाच्या माध्यमातून पोहोचली याची चौकशी सध्या सुरू आहे. तिच्याही घरी एनसीबीकडून झडती घेतली जाऊ शकते.