Sameer Wankhede, Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सीबीआय चौकशी सुरू असलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जूनला होणार आहे, त्यामुळे ८ तारखेपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आर्यन खान प्रकरणात सीबीआयने शनिवारी सुमारे 5 तास चौकशी केली. तपास एजन्सीने त्याच्याकडून मुंबईतील कार्यालयात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलूंवर उत्तरे मागितली आणि लाच घेतल्याच्या आरोपांमध्ये त्याची भूमिका तपासली. चौकशीनंतर समीर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर ‘सत्यमेव जयते’ म्हणत पुढे निघून गेले होते. त्यानंतर आता त्यांना अटकेपासून पुन्हा एकदा संरक्षण मिळाले आहे.
समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांना आजपर्यंत म्हणजेच, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज त्यांच्या अटकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात कोर्टाने अटकेपासून संरक्षणाचा निर्णय कायम ठेवला असून पुढील सुनावणी ८ जूनला होणार असल्याचे स्पष्ट केले.
सीबाआयने समीर वानखेडे यांची चौकशी केली. कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या २५ कोटी रुपयांच्या खंडणी आरोपावरून समीर वानखेडे या प्रकरणी सीबीआयने चौकशी केली. तब्बल ५ तास ही चौकशी चालली. यावेळी वानखेडेंना सुमारे १५ ते २० प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे प्रश्न आर्यन खान आणि किरण गोसावी यांच्यातील संबंध आणि छापेमारीच्या माहितीशी संबंधित होते अशी माहिती आहे. चौकशीनंतर मीडियाने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत निघून गेले. त्यानंतर ते थेट सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही गेले होते.