मुंबई : कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरील कारवाईमुळे पहिल्या दिवसापासून विविध आरोपांना सामोरे जावे लागणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) रविवारी याप्रकरणी मोठा धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न झाला होता. त्यासाठी २५ कोटींची मागणी होऊन १८ कोटींवर तडजोड होऊन त्यातील ८ कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट या कारवाईत पंच साक्षीदार असलेल्या प्रभाकर साइल याने केला आहे. नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करून त्याने हे आरोप केले आहेत.
साइल हा एनसीबीच्या केसमधला ९ पंचापैकी एक पंच आहे. सध्या विविध गुन्ह्यांत फरारी असलेल्या किरण गोसावी याचा अंगरक्षक म्हणून तो काम करीत होता. हा व्यवहार गोसावी, सॅम व शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी यांच्यात ३ ऑक्टोबरला पहाटे झाला होता. त्यातील ५० लाख रुपयांची रोकड मी गोसावीकडे आणून दिली होती. त्यानंतर पूजाने फोन न उचलल्याने हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही, असा दावा त्याने केला आहे. ३ ऑक्टोबरला पहाटे साडेतीन-चारच्या दरम्यान आम्ही लोअर परेळच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठीमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत पूजा दादलानी बसलेली होती. त्या तिघांमध्ये बैठक झाली.
या बैठकीत त्यावेळी काय झाले, हे मला समजले नाही. गोसावी पुन्हा गाडीत येऊन बसले. तेव्हा त्यांनी फोन केला. २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे गोसावी फोनवर बोलत होते. मी त्यांचे एवढे फोनवरचे संभाषण ऐकले, असे साइलने व्हिडिओमध्ये सांगितले. या व्हिडिओमध्ये साइलने समीर वानखेडे यांच्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
साइलचे प्रतिज्ञापत्र आणि हे संपूर्ण प्रकरण कथन करणारा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे एनसीबीबरोबरच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी या घटनेमुळे एनसीबी व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेत्यांनीही टीकेला उत्तर दिले. एनसीबीने साइलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी ते न्यायालयात बाजू मांडणार आहेत. दिवसभर याप्रकरणाची चर्चा रंगली.