मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर आलेली अभिनेत्री अनन्या पांडे हिच्यासमोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. तिच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक गॅझेट तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्याबरोबर केलेल्या संदेशाच्या देवाण-घेवाणीची आणि काही नावांची शहानिशा त्यातून केली जाणार आहे. अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास चौकशी केली आहे.
ती पूर्ण न झाल्याने येत्या सोमवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तिने आर्यन खानसमवेत केलेल्या ड्रग्जसंबंधीचा व्हाॅट्सॲप चॅट महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्याशिवाय ड्रग्जच्या अनुषंगाने दोघांमध्ये पूर्वीही वेळोवेळी संभाषण झाले असल्याची शक्यता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तिच्याकडून जप्त करण्यात आलेले दोन्ही मोबाइल फोन, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय अनन्या व आर्यन आणि इतरांमध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्याच्या शक्यतेने तिच्याकडे चौकशी केली जाणार आहे.
विविध कार्ड, बँक व्यवहार तपासले जातील. अनन्या शुक्रवारी तीन तास उशीरा कार्यालयात पोहोचली. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी तिला हे प्रोडक्शन हाऊस नव्हे, सरकारचे कार्यालय आहे. त्यामुळे इथे वेळेवर यायला हवे अशा शब्दांत सुनावले.
सात इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतले ताब्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री अनन्या पांडेचे सात इलेक्ट्रॉनिक गॅजेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे. फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचा आहे, जे कदाचित हटविण्यात आले असतील. एनसीबीला हे चॅट्स रिट्राइव्ह करायचे आहेत. सोमवारपर्यंत हा डेटा पुन्हा मिळाल्यास अनन्या पांडेची त्या आधारावर चौकशी केली जाणार आहे.