मुंबई : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगामध्ये असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे त्याचे वडील बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम असून ‘अभी पिक्चर बाकी है,’ असे म्हणत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
न्यायमूर्ती सांबरे यांनी आर्यनबरोबरच अरबाझ मर्चंट व मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी काही अटी कोर्टाने घातल्या असून, सविस्तर आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे. त्यामुळे आर्यनला गुरुवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली. एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आर्यन व अन्य दोघांच्या जामिनाला विरोध केला. आर्यन ड्रग्जचे नियमित सेवन करतो आणि त्याला ते पुरविले जाते, त्यासंदर्भात आमच्याकडे पुरावे आहेत. रचलेला कट सिद्ध करणे कठीण असते; कारण ते फक्त कट रचणाऱ्यांनाच माहीत असते, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.
युक्तिवादात आर्यनच्या वकिलांनी आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज एनसीबीने ताब्यात घेतले नसल्याच्या मुद्द्याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर पाच जणांनी सोबत काय घेतले होते, याच्याशी आर्यनचा काय संबंध? त्या क्रूझवर १३०० लोक होते, मग सगळेच या कटात सहभागी होते असे म्हणायचे काय, असे सवाल करीत कट केल्याचे चुकीचे कलम लावल्याचा युक्तिवाद केला.