मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत तहकूब केली. आर्यनच्या जामिनावरील युक्तिवाद ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मंगळवारी पूर्ण केला. मात्र, बुधवारच्या सुनावणीत त्यांनी न्यायालयाला आर्यनचा अटक मेमो पाहण्याची विनंती केली.
या मेमोमध्ये आर्यनने कट रचल्याचा एनसीबीने उल्लेख केला नसल्याचे रोहतगी यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या निदर्शनास आणले.आज इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला. गुरुवारी एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग न्यायालयात युक्तिवाद करतील.
मुनमुन धनेचातर्फे ॲड. काशीफ खान देशमुख यांनी युक्तिवाद केला. धमेचा फॅशन मॉडेल आहे. क्रूझवर तिला तिच्या कामानिमित्त बोलविण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. अरबाज मर्चंट याच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकारनवाब मलिक यांना एनसीबीविरोधात कोणतीही टिपणी करण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांनी नकार दिला.मुंबईचे रहिवासी व मौलाना असल्याचा दावा करणाऱ्या कौसर अली यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे पुनर्वसन करीत असल्याचा दावाही कौसर अली यांनी याचिकेत केला आहे.