मुंबई : क्रूझवरील कारवाईतील वादग्रस्त पंच आणि अनेक गुन्ह्यांत फरार असलेल्या किरण गोसावीलाही आता आपल्या जिवाला धोका असल्याची भीती वाटू लागली आहे. त्याचा बॉडीगार्ड व अन्य पंच प्रभाकर साईल याने त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सोमवारी अचानकपणे त्याने विविध वृत्तवाहिन्यांशी संपर्क साधून आपली बाजू मांडू लागला आहे. त्याचबरोबर आपण उत्तर प्रदेशातील लखनौ पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
एनसीबीच्या कारवाईवेळी गोसावी एखाद्या अधिकाऱ्यांच्या थाटात आर्यन खानच्या दंडाला धरून कार्यालयात नेत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला पंच केल्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला. सोमवारी त्याचा बॉडीगार्ड साईलने आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला. त्याने वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून सर्व आरोप फेटाळले.
गोसावीकडून पुणे पोलिसांशी संपर्क नाहीकॅडेलिया क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार आणि पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढलेला किरण गोसावी याचा पुणे पोलीस शोध घेत असून, त्याच्याकडून शरण येण्याबाबत संपर्क साधला नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे. तर गेल्या आठवड्यात गोसावी याची व्यवस्थापक शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (२७, रा.गोवंडी) हिला पुणे पोलिसांनी अटक केली होती.
पूजा ददलानी यांच्याशी भेट नाहीआर्यन खानला अटक केल्यानंतर तीन ऑक्टोबरनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, माझ्या जिवाला धोका असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, साईलचे आरोप निराधार आहेत. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीसोबत कधीही भेट झाली नाही, असा दावा त्याने केला.
तो सेल्फी क्रूझवर काढलामला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला ही माहिती दिली होती. त्यानंतर क्रूझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता, तर तो क्रूझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे.
समीर वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्री यांची चर्चाएनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भातील घडामोडींबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चर्चा केली. वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासंदर्भातही यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वानखेडे यांच्यावरील आरोपांसंदर्भात एफआयआर दाखल करायचा तर तशी तक्रार आधी पोलिसांकडे द्यावी लागते. तशी तक्रार आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले. मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात ते म्हणाले की, मलिक नांदेडला असून परतल्यावर त्यांचे काय म्हणणे आहे हे मी ऐकून घेईन.