मुंबई : पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपाबरोबरच कारवाईच्या दरम्यानचे व्हायरल फोटो व व्हिडिओ एनसीबीसाठी अडचणीचे ठरणारे आहेत. पंच किरण गोसावी हा एनसीबीच्या कार्यालयात आर्यन खानच्या शेजारी बसून सेल्फी घेतो, त्याला मोबाइलवर बोलायला लावत असल्याचे स्पष्ट दिसते. मुळात हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे मत कायदेतज्ज्ञ आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फरार म्हणून घोषित असलेला एक आरोपी एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेसाठी मुख्य साक्षीदार बनू शकतो का, एनसीबी अधिकाऱ्यांऐवजी आर्यनला क्रूझवरून एनसीबी कार्यालयात घेऊन येऊ शकतो का, तसेच एनसीबीच्या कोठडीत असताना त्याच्या सोबत सेल्फी काढू शकतो का, असे प्रश्न कायदेतज्ज्ञांनी उपस्थित केले.
याबाबत साईल यांनी सांगितले की, किरण गोसावी अहमदाबादवरून निघाले होते. ते पावणेतीनला एनसीबी ऑफिसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला. रात्री दोन वेळा त्यांची मीटिंग झाली. साडेचारला तेथून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. सॅम हा शाहरूख खान व गोसावी यांच्यामधला दुवा होता, असा दावा साईल यांनी केला.
साईल यांनी सांगितले की, मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पूजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पूजामध्ये २० मिनिटे बोलणे झाले. तीन तारखेच्या साडेपाचला सकाळी पुन्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पूजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉटसॲप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डीलबाबत सांगितले. पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला.
अर्जंट ताडदेव रोडला इंडियाना हॉटेलबाहेरून पैसे कलेक्ट करायचे आहेत. तिथे ५२०१ नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून ५० लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो. वाशीला येऊन मी पैसे सरांना दिले. संध्याकाळी ५ वाजता वाशी इनॉर्बीट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा पैशाची पिशवी दिली. तेथून ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत ३८ लाख रुपये होते. सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरून विचारले. गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करत असल्याचे त्यांना सांगितले होते.