आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किरण गोसावी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांनी काल रात्री त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातच किरण गोसावीनं एक व्हिडिओ जारी करत ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दुसरा पंच प्रभाकर साईलवर खळबळजनक आरोप केला आहे.
"मुंबई पोलिसांनी जर प्रभाकर साईलचं प्रकरण हातात घेतलंच आहे तर त्यांनी सर्वात आधी प्रभाकरवरच कारवाई करावी. त्याचे आणि त्याच्या भावाचे फोन रेकॉर्ड तपासावेत. मंत्री वगैरे जेवढे याच्यामागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी", असं किरण गोसावी यानं आवाहन केलं आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले.
प्रभाकर साईल यानं किरण गोसावीबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. किरण गोसावी यानं सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीसोबत आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या व्यवहाराची चर्चा केली होती. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी रुपये देण्याचा उल्लेखही झाला होता, असा खळबळजनक दावा प्रभाकर साईल यानं केला आहे. प्रभाकरचा आरोपांना प्रत्युत्तर देताना किरण गोसावी यानं आज व्हिडिओ जारी करत साईल आणि त्याच्या भावाचे सीडीआर रिपोर्ट तपासण्याची मागणी केली आहे.
"प्रभाकर साईल जे काही बोलतोय त्यात काहीच तथ्य नाही. सॅम डिसोजासोबत संभाषण कुणाचे झाले आहेत. किती पैसे कुणी घेतलेले आहेत. प्रभाकर साईला गेल्या पाच दिवसात काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलवरुन तुम्हाला स्पष्टपणे समजेल. माझी फक्त एकच विनंती आहे की प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट व मोबाइल चॅट्स काढावेत. माझेही चॅट्स तपासा जर मी कुठे प्रभाकर साईलसोबत काही बोललो असेन असं वाटत असेल तर नक्कीच माझाही मोबाइल तपासा. माझा इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे त्यामुळे पूर्वीच्या काही चॅट्समध्ये मी त्याला पैसे आणण्यासाठी काही ठिकाणी पाठवायचो. पण आता दोन तारखेनंतरचे चॅट्स तपासावेत आणि कुणाकुणाचे काय काय संभाषण यानं डिलीट केले आहेत. ते डिलीट केलेले संभाषण पण काढावेत", असं प्रभाकर साईल यानं व्हिडिओत म्हटलं आहे.