लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीच्या आरोपप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या हाती पुरावा सापडला आहे. या कारवाईच्या रात्री लोअर परळ परिसरात शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी ही वादग्रस्त पंच किरण गोसावी याला भेटल्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. विशेष तपास पथकाकडून त्याची छाननी केली जात असून, लवकरच पूजाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.
एनसीबीने २ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रुझवर छापा टाकून आर्यन खानसह ८ जणांना अटक केली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर साईल याने आर्यन खानला सोडविण्यासाठी किरण गोसावी, सॅम डिसुझा व पूजा दादलानी यांच्यात २५ कोटींची ‘बोलणी’ झाली होती. त्यात १८ कोटींमध्ये ‘डील’ झाली होती. त्यातून ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, मात्र हा सौदा पूर्ण झाला नाही, अशी कबुली दिली होती. त्यासाठी लोअर परळ येथे तिघे भेटले होते, वानखेडे यांनी साक्षीदार म्हणून माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असा जबाब दिला आहे.
साईलच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापन केली. सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली चारजणांची टीम तपास करत आहे. त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्यामध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पूजा दादलानीची कार दिसून आली आहे. याठिकाणी तिची गोसावी व सॅम डिसुझाबरोबर भेट झाली होती.