क्रूझ ड्रग्ज पार्टीवरून एनसीबीने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. २६ दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पूर्ण झाली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला ती रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर शनिवारी आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून सुटका होण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाकडून काही पैसे देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
आर्थर रोड कारागृहाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाने ९ हजार ७५० रुपये परत केले आहेत. आर्यन खानने आर्थर रोड जेलमध्ये एकूण पाच हजार अडीचशे रुपये खर्च केले. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने शिल्लक रक्कमेची मोजणी करुन आर्यनला ९ हजार ७५० रुपये परत केले. तुरुंगात असताना आर्यन खानला त्याच्या कुटुंबीयांकडून १५ हजार रुपये मनीऑर्डर देण्यात आली होती.
कारागृहातील कूपन सिस्टम बंद झाली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही कैद्याला त्याच्या कुटुंबाकडून केवळ मनी ऑर्डर केली जाते. या मनी ऑर्डरद्वारे मिळालेल्या पैशातून कोणताही कैदी कारागृहात असलेल्या कॅन्टीनमध्ये त्याच्या आवडीचे जेवण खाऊ शकतो.