क्रूझ ड्रग केस प्रकरणी बॉलिवुडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आर्यन खान आणि अन्य ८ जणांच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. असे असले तरी आर्यन खानला आजची रात्र एनसीबीच्या कार्यालयात घालवावी लागणार आहे.
दरम्यान, आर्यन खानच्या कोठडीबाबत सुनावणी सुरु असताना शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी तिथे उपस्थित होती. पूजा सतत रडत होती. आर्यनची झालेली अवस्था तिला पहावत नव्हती. उद्या 11 वाजता आर्यनच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.
आर्यन खानने आपल्या वकिलाला त्या रात्री झालेला घटनाक्रम सांगितला. आर्यन खान जेव्हा क्रूझ टर्मिनलकडे पोहोचला तेव्हा अरबाज तिथे उभा होता. त्याला ओळखत असल्याने आर्यन आणि तो क्रूझमध्ये जाऊ लागले. तिथे पोहोचताच तिथे असलेल्या काहींनी ड्रग्ज आणलेस का असे विचारले. यावर आर्यनने नाही असे उत्तर दिले. त्यांनी आर्यनच्या बॅगची तपासणी केली. यानंतर आर्यनची तपासणी केली. मात्र, त्यांना काही मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आर्यनचा फोन ताब्यात घेतला आणि एनसीबीच्या कार्यालयात घेऊन गेले. रात्री उशिरा दोन किंवा अडीज वाजता वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली.
एनसीबीने न्य़ायालयाला सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. यामध्ये एक नायजेरियन व्यक्ती आहे. त्याच्याकडून 40 इक्टसी टॅबलेट जप्त करण्यात आली आहेत.