मुंबई – क्रुझ ड्रग्ज(Drugs Case) पार्टीवर धाड टाकून NCB नं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याला अटक केली आहे. सध्या हे प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजत आहे. यात NCB नं स्वतंत्र साक्षीदार बनवलेला किरण गोसावी हा फरार असल्याचं समोर आलं होतं. सोमवारी रात्री किरण गोसावी सरेंडर करणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या.
आता किरण गोसावी प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. गोसावी निगडित सूत्रांनी एक ऑडिओ क्लीप जारी केली आहे. ज्यात गोसावी उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधत आहे. या कथित ऑडिओ क्लीपची कुणीही पुष्टी केली नाही. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपमध्ये गोसावी म्हणतोय की, मला तिथे यायचंय, मी किरण गोसावी बोलतोय, मला सरेंडर करायचं आहे. तेव्हा पोलीस अधिकारी विचारतात तू इथं का आला आहेत? यावर गोसावीने सध्या माझ्या सर्वात जवळचं पोलीस ठाणे हेच आहे असं सांगितले. तेव्हा पोलीस अधिकारी सांगतात, नको, तू इथं सरेंडर करू शकत नाही. दुसरीकडे प्रयत्न कर. या ऑडिओ क्लीपवर युपी पोलिसांनी दावा नाकारला आहे. तर दुसरीकडे मडियावचे पोलीस निरीक्षक मनोज सिंह म्हणाले की, मला यात प्रकरणात अद्याप कुठलाही फोन आला नाही. मला याची माहिती नाही. पोलीस गोसावी संबंधित माहिती देण्यास नकार देत असले तरी मडियाव पोलीस ठाण्याबाहेरील वातावरण वेगळेच संकेत देत आहेत.
महाराष्ट्रात गुन्हा मग यूपीत सरेंडर का?
मुंबई क्रुझवर(Mumbai Cruise Rave Party) छापेमारीवेळी किरण गोसावी त्याठिकाणी उपस्थित होता. जेव्हा आर्यन खानला NCB ऑफिसला आणलं तेव्हाही गोसावी हजर होता. स्वतंत्र साक्षीदार म्हणून सांगितल्या जाणाऱ्या गोसावीचे आर्यन खानसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मीडियानुसार, किरण गोसावी लवकरच लखनऊ पोलिसांसमोर सरेंडर करणार आहे. महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाही, त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा गोसावीने माध्यमांशी बोलताना केला आहे अशी बातमी न्यूज १८ ने दिली आहे.
प्रभाकर साईलच्या दाव्यावर किरण गोसावी काय म्हणाला?
पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला किरण गोसावी अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. सोमवारी तो मीडियासमोर आला. त्याने सांगितले की, ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलद्वारे केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. साईलनं शाहरुख खानच्या मुलाला सोडवण्यासाठी २५ कोटींची डिल झाल्याचा दावा केला होता. त्यातील ८ कोटी NCB अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होते असंही म्हटलं होतं. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता.