क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला २० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर २० ऑक्टोबरला निर्णय होणार आहे. सुनावणी पूर्ण केल्यानंतर कोर्टाने निर्णय ठेवला राखून आहे.
आर्यन शाहरुख खानच्या जामीन अर्जावर आजही निर्णय झाला नाही. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. एनसीबीने आज मोठमोठे खुलासे केले आहेत. सरकारी वकिलांनी आर्यनच्या जामिनाला विरोध करत आर्यन खान गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला आहे. जरी त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नसले तरी तो अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेतो आणि ड्रग पेडलरांच्या संपर्कात असतो.
आर्यन खानने केवळ भारतातच नाही तर परदेशांमध्ये युके, दुबई आणि अन्य देशांमध्ये ड्रग्ज घेतले आहे. तो नेहमी त्याचा 15 वर्षांपासूनचा मित्र अरबाजसोबत ड्रग्ज घेतो. अरबाज हा एसीबीने रेड टाकली तेव्हा देखील आर्यन सोबत होता. त्याच्याकडून 6 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. क्रूझ समुद्रात प्रवासावर जाताच हे दोघे तिथे ते ड्रग्ज घेणार होते, असा दावा एनसीबीने केला आहे.