पनवेल - ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाला चौकशीसाठी तळोजा येथील आरएएफ मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी आणण्यात आले आहे. एनसीबीच्या विशेष टीम आर्यन खानची चौकशी करीत आहे. समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे.
एनसीबीच्या कार्यालयाबाहेर होणारी गर्दी, तपासात कोणताही व्यत्यय नको म्हणून आर्यन खानला चौकशीसाठी थेट तळोजा येथील आरएएफ मुख्यालयात आणले आहे.सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा १३ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. आर्यन उद्या २४ वर्षांचा होईल. गेल्या २ महिन्यांपासून आर्यन खान अडचणीत आहे. ड्रग्ज पार्टीत सापडल्यानं आर्यनला एनसीबीनं अटक केली. जवळपास तीन आठवडे तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. ड्रग्ज पार्टी प्रकरणाची सुनावणी उद्याप पूर्ण झालेली नाही. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आर्यनकडून सुरू आहे. त्यामुळे आर्यनचा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल.
आर्यनचे आतापर्यंतचे वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरे झाले आहेत. मात्र यावर्षी तसा वाढदिवस साजरा होण्याची शक्यता कमी आहे. इंडिया टुडेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचा २४ वा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल. वाढदिवसाला कुटुंबीय असतील. बहिण सुहाना अमेरिकेहून कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित असणार आहे. मात्र, आर्यन खान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे.