मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. दरम्यान, गेले २५ दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर या तिघांनाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली.
आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही एकाच दिवशी हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही अरबाज आणि मुनमुन यांना आर्यनपेक्षा एक रात्र जास्त तुरुंगात घालवावी लागली. ३० ऑक्टोबरची रात्र तुरुंगात काढल्यानंतर त्यांना आज (३१ ऑक्टोबर) सोडण्यात आलं. आर्यन पाठोपाठ आता मुनमुन धमेचा हिची आज सकाळी भायखळा कारागृहातून सुटका झाली. तसेच अरबाज मर्चंटचीही आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे.
आर्यन खान हा ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटला. पण अरबाज आणि मुनमुन यांना आणखी एक रात्र तुरुंगातच घालवावी लागली. अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांची सुटका कागदोपत्री पूर्ण न झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला विलंब लागला होता.